Friday, April 17, 2020

माझ्या आठवणीतील शाळा. भाग ३


शाळा म्हटली की जसा फळा आठवतो तसे एकदम रिकामे बाक ही नजरे समोर येतात. स्वत:च्या हक्काची जागा आणि आपले अस्तित्व दाखवणारी एकमेव जागा म्हणजे आपला बाक. तो बाक आपल्या आयुष्यात एवढा महत्वाचा ठरू शकेल हे कधी स्वप्नातही न सुचलेले. बाकावर दप्तर ठेवणे, बाकाच्या खालच्या कप्यात वह्या पुस्तक ठेवणे. परीक्षेच्या काळात कॅापीचा कागद बाकाच्या खाली लपवने, रिकाम्या वेळात तबला समजून वाजवणे असे एक ना अनेक रूपे बाकाची. याचं बाकावर डोके ठेऊन झोपलेले. मार्कांची लाज वाटली की बाकात डोके खुपसायचे, पेन-पट्टीचा खेळ याचं बाकावर रंगायचा. शिक्षकांनी डस्टर आपटल्यावर बनलेल्या खडूच्या पाउडरच्या ठश्यात बोटाने रांगोळी काढण्यात मजा यायची ती वेगळीच. शिक्षकांनी पुस्तके वह्या काढायला सांगितली की दोनंदा-तिनदा स्वतःच्या बाकावर जोरात आपटून वर्गात तात्पुरती अशांतता पसरवने. या सर्व करामती केवळ एका बाकामुळे शक्य झाल्या.


पुढे वर्ग वाढला, बाकांची उंचीही वाढली. गणितात कर्कटक जेवढे वापरले नसेल तेवढे ते बाकावर वापरले. मध्येच एखादी नक्षी, मग स्वतःच्या ग्रुपचे नाव, मैत्रीणिंची नावे, मधूनच बाकाला होल पाडने अश्या अनेक गोष्टी कर्कटकाच्या सहाय्याने केल्या. बाकावर पडलेले शाईचे डाग, चित्रकलेच्या तासाला सांडलेले रंग, काही आगाऊ मुल बाकावरून चालल्यामुळे उमटलेले मातीने ठसे, मधल्या सुट्टीत बाकावर बसुन जेवलेली ती मजा काही वेगळीच होती. पण बाकाचे अस्तित्व खरे तेंव्हा जाणवायचे जेव्हा डोके बाकावर ठेवलेले असताना बोटाने हलके ठोकुन कानाने त्याचे पडसाद ऐकतो.

चार भिंतीची माझी शाळा ।

पांढऱ्या भिंती आणि फळा काळा ॥

तो शाळेतला विशाल फळा नाही आठवला असे होनारच नाही. शिक्षकांनी फळ्याकडे तोंड केले की शांत बसलेल्या मुलांमधे चुळबुळ सुरू व्हायची. सगळ्यां समोर शिक्षा केली की मात्र लाज वाटायची. फळ्यावरचा सुविचार रोज नविन काहीतरी शिकवून जायचा. वर्गप्रमुख जेंव्हा वर्ग सांभाळायचा तेंव्हा बोलणाऱ्या मुलाची नावे फळ्यावरच लिहीत असे आणि एवढे करून तो मुलगा बोलत असेल तर त्याच्या नावांपुढे फुल्या चढवल्या जात. वहीत शंभर वाक्य लिहीली असली तरी खडुने फळ्यावर लिहीण्याची शान वेगळीच होती.

शिक्षक फळ्यावर लिहीत तेंव्हाही मजा वाटे. काही शिक्षक मोत्यासारखे वळणदार अक्षरात लिहीत असे तर काही शिक्षकांच्या अक्षरांची आगगाडी कधी वर तर कधी खाली जात असे. चित्रकलेचे सर थोड्याच वेळात दोन रंगाच्या खडूंचा वापर करून अप्रतिम चित्र काढत तर विज्ञानाचे शिक्षक चार रंगांचा खडु वापरूनही प्रयोगाची आकृती धड काढत नसे. इतिहासाच्या तासाला फक्त सनावळ्या लिहील्या जायच्या तर गणिताच्या तासाला तो मोठा फळा ही कमीच पडायचा.

तर असा हा फळा. एकाच रंग, एकच आकार पण असंख्य गोष्टी त्याच्याशी जडलेल्या. कित्येक गोष्टी त्याच्यावर लिहील्या गेल्या, आणि पुसल्याही गेल्या. आज परत शाळेत जायचा योग आला, तर आवर्जून मी त्या वर्गातल्या बाकावर बसेन जरी मला त्यात नीट बसतां नाही आले तरी. आजही त्या फळ्यावर सुविचार लिहायचाय. आज सर्व काही झपाट्याने बदलत असताना तो ‘बाक’ आणि तो ‘फळा’ आणि त्याचा स्वतःचा असा विशिष्ट वास अजून स्मरणात आहे.

3 comments: