Monday, April 20, 2020

कृष्णाला रूक्मिणी मिठासासारखी वाटते

आपण लहान असताना आपल्याला घरातील मोठी माणसे गोष्टी सांगायची. मला ही माझ्या आजी ने गोष्टी सांगीतलेय. माझ्या घरी माझे आजी आजोबा माळकरी असल्यामुळे आमच्या घरात विठ्ठल रूक्मिणी आणि राधा कृष्णाच्या गोष्टी सांगीतल्या जायच्या. अशीच एक कृष्णाची गोष्ट माझ्या आजीने सांगितली होती तीच मी गोष्ट मांडत आहे.   

एकदा  कृष्णा आपल्या दोन्ही बायकांशी गप्पा मारत बसले होते.

गप्पांमध्ये सत्यभामाने विचारले की,......

“नाथ मी आपल्याला किती आवडते?”

त्यांवर कृष्ण म्हणाले,....

“हे सत्यभामे साखरे प्रमाणे आवडतेस.” लगेच रूक्मिणीने हाच प्रश्न विचारला तर कृष्ण म्हणाले, “रूक्मिणी तू मला मिठासारखी आवडतेस.”

हे ऐकून सत्यभामा खुप खुष झाली की आपण पतीला गोडाप्रमाणे वाटतो आणि तिकडे रूक्मिणि रूसुन बसली की मी मिठाप्रमाणे. रागात रूक्मिणी तिथून निघून गेली. आपल्या प्रिय रूक्मिणीला रागावलेले बघून दुसऱ्या दिवशी कृष्णाने स्वयंपाकात मिठ न घालण्याची सूचना दिली आणि जेवनात गोड धोड पदार्थही करायला सांगीतले.

स्वयंपाक तयार झाला. कृष्ण नेहमीप्रमाने जेवले. परंतु जेव्हा रूक्मिणी व सत्यभामा जेवायला बसल्या तर बघतात तर काय पहिलाच घास तोंडात घातल्याबरोबर जणू काही चवच लागली नाही. वरण, भात, भाजी, आमटी, भजी सर्वांची तीच गत.

आधिच रागात असलेली रूक्मिणी स्वयंपाकावर चिडून म्हणाली,.......

“स्वयंपाक फार आळणी झालाय.”भगवंताच्या सूचनेनुसार स्वयंपाकी म्हणाला,”आज मीठ संपले होते, म्हणून जेवन आळणी बनवाव लागले.

अर्धपोट जेवून उठली रूक्मिणी आणि महालात फेऱ्या मारू लागली.

तेवढ्यात तिथे कृष्ण आले आणि म्हणाले,..........

“की जेवन एवढ्या लवकर कसे झाले? आज गोडाधोडाचा स्वाद घेतला नाही वाटत.”

त्यांवर रूक्मिणी रागाने म्हणाली,........

“गोडाचे कौतुक तुम्हाला असेल, पण इतर पदार्थ अगदीच अळणी होते. मिठाशीवाय स्वयंपाकाला जरातरी चव होती का?”

यांवर कृष्ण म्हणाले,.....

“मीठ नसल्याने स्वयंपाकाच्या चव नाही, हे तूच म्हणतेस आहे बघ. मग मी तुला मीठासारखी आवडतेस म्हंटल्यावर तू रागावली.”

पतीच्या बोलण्यातला अर्थ समजल्यावर रूक्मिणीच्या गालाची कळी एकदम खुलन गेली.

Sunday, April 19, 2020

भाऊबीज

    भाऊबीज म्हणजे भावा बहीणीच्या प्रेमळ नात्यांचा उत्सव. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज हा सण कार्तिक शुध्द द्वितीये दिवशी असतो. या दिवसाला यमद्वितीया असेही देखील म्हणतात. तर हिंदीत या सणांस भाईदूज असे म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये भाई फोंटा या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये भाऊबीजेचा सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपालमध्ये देखील हा दिवस भाईतिहार म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थणा करते.

भाऊबीजेच्या दिवशी बहीणी आपल्या भावांना गोडाच्या जेवणाचे आमंत्रण देतात. बासुंदी पुरी हा या दिवसाचा खास बेत असतो. आपल्या भावाला ओवाळून बहिणी त्याच्या कपाळी कुंकवाचा टीळा लावतात. हा टीळा आपल्या भावाच्या दीर्घ आणि आनंदी जीवनासाठी असतो. संध्याकाळी चंद्राची कोर दिसल्यावर बहीण प्रथम चंद्राला ओवाळते आणि त्यानंतर आपल्या भावाला ओवाळते. बहीणीने ओवाळल्यानंतर भाऊ ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहीणीचे कौतुक करतो.

भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पुजा करते. भावाची पुजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो दीर्घायुषी व्हावा हा यामागे हा खरा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तिप्रमाणे पैसे, कपडे, दागिना अशा वस्तु ओवाळणी म्हणून देतो. या दिवशी सख्खा किंवा दुरचा भाऊ नसल्यास चंद्राला ओवाळण्याची पध्दत आहे, म्हणूनच आपण लहाण मुलांना चंद्राला चांदोमामा अशीच हाक मारायला शिकवतो.

भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात?

भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात या माग एक कथा सांगितली जाते. कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पुजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्रे, अलंकार ,वस्तु देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्यास त्यावर्षी तरी यमापासून भय नसते असे मानतात.

यम आणि यमी या भाऊ-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की, यम मृत्यू पावला तेव्हा यमीला एवढे दुःख झाले की ती आपले रडणे व डोळ्यातलं अश्रु काही केल्या थांबवेना. तेव्हा अखेर देवाने दिवस संपला असे भासवण्यासाठी रात्र निर्माण केली. मग यमीला भावाच्या मृत्यू मुळे झालेले दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा आहे. आपल्या भावाला दीर्घायूष्य लाभावे यासाठी बहीणीने यमराजाची पुजा आणि प्रार्थणा करायची असते.

“आई नंतर” जर जगात तुमच्यावर जीव टाकणारच कोणी व्यक्ति असेल तर ती म्हणजे “बहिण”
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही आई निर्माण केली. आई फार काळ असु शकत नाही म्हणून त्याने कदाचित आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली. कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी राहते. गुणांच तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरून घालते. बाजू घेउन भांडायला ती सदैव तत्पर असते. माझा भाऊ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने गहीवरलेला असतो.

“बहीण मग ती कोणाचीही असो, तीचा नेहमीच आदर करा…….

हीच खरी भाऊबीज असते………..

Saturday, April 18, 2020

बाप.........बाप हा बाप असतो

    
वडिलांन बद्दल काय बोलायच. बाप… हा बापच असतो. मी एकदा आमच्या शाळेमध्ये एका मुलीच वक्तृत्व ऐकल होत. मला ते खुप आवडले होते. ती वडीलांबद्दल खुप काही चांगल बोलुन गेली. तेच मी ईथे मांडत आहे.

बाबा, पप्पा, ड्याडी, बोलायला ऐकायला किती छान वाटते ना ! पण आपण कधी कधी मुद्दामच जाणून बुजून त्यांना बाप या नावाने संबोधतो. आज अशाच एका बापाची कहाणी.

आई घरच मांगल्य असते तर वडील घराचे अस्तित्व असतात, पण आपण या अस्तित्वाला कधीच समज़ुन घेतले आहे, त्यांच्या विषयी अजून तरी फारसे चांगले बोलले जात आहे……... नाही

लोकांनी वडील रेखाटलेले आहेत ते ही तापट, व्यसनी, चिरखोड, भांडखोर, मारझोड करणारे. असे वडील असतील ते ही ३ ते ४ % पण बाकीच्या चांगल्या वडीलांबद्दल काय?

आई कडे अश्रु चे पाठ असतात ती रडुन मोकळी होते, पण सांत्वन करणारा बाप कोणालाच दिसत नाही. आणि रडणाऱ्या पेक्षा सांत्वन करणार्यावरच जास्त तान पडत असतो कारण ज्योती पेक्षा तो छोटा दिवाच जास्त पेटत असतो. आणि श्रेय मात्र ज्योती घेऊन जाते. रोजच्या जीवनाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शीदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहज विसरून जातो. आई सर्वांनसमोर मोकळेपणाने रडून दुःख व्यक्त करते पण रात्री उशीर तोंड खुपसून मुस्मुसतात ते आपले वडीलच असतात. स्वःताचे वडील जरी वारले तरी त्यांना रडता येत नाही कारण लहान भावंडांना धीर देणे, कुटुंबाला आधार देणारे पण तेच असतात. पत्नी आर्धातच सोडून गेली तरी स्वःताला अवर घालत मुलांच्या अश्रुंना आवर घालणारे ते वडीलच असतात.
जिजाऊ ने शिवबाला घडविले असं अवश्य म्हणतां येईल पण त्यांच वेळी शहाजीराजांची ओढातान लक्षात घ्यावी. देवकी यशोधेच कोतुक अवश्य कराव पण त्यांच वेळी भर पुरात डोक्यावरून पुत्राला घेउन जाणारा वासुदेव आठवावा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य आहे पण पुत्र वियोगाने तडफडुन मरणारा राजा दशरथ होता.

वडीलांच्या चीरलेल्या टाचा, झिजलेली चप्पल, आणि फाटलेले बनियन पाहिले की कळते की नशिबाची भोक त्यांच्या बनियन ला पडली आहेत, त्यांचा दाही वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो, मुलांना कपडे घेतील, बायकोला साडी घेतील, पण स्वःता मात्र जुनेच कपडे वापरतील. मुलगा संलुन मधे ५०₹ खर्चतो, मुलगी पार्लर मधे १००₹ खर्चेल, पण त्यांच घरातील बाप मात्र दाढीचा साबन संपला तर अंघोळीच्या साबणाने दाढी करतील, कधी कधी तो ही नसला तर नुसती पाणी लावून दाढी करतील. बाबा कधी आजारी पडले तर डाॅक्टर कडे जात नाहीत, मुळात ते आजारपणाला घाबरताच नाहीत, त्यांना काळजी असते ती डाॅक्टर सांगतील महिनाभर आराम करायला. त्याच्या पुढे काही नशिबाने वाडुन ठेवलेल असत. मुलीच लग्न, मुलाच शिक्षण, घरातील सर्व खर्च याची काळजी असते कारण घरात कमवणारा तो एकटाच असतो.
ऐपत नसली तरी सर्व खर्चात काटकसर करून मुलाला मेडिकल, इंजिनीअरिंग या सारख्या महागड्या शिक्षणाचा खर्च सोसतात. महिन्याचा पगार झाला की सर्व खर्चात बचत करून , काटकसर करून पहिला मुलाला पैसे पाठवतात, खर तर मला सर्वच मुले म्हणायची नाहीत पण काही मुले आहेत की बापाने दीलेल्या पैस्याने शिक्षण कमी आणि मजाच जास्त मारतात. एवढच नव्हे तर या सगळ्यात आपल्याला पैसे पाठवनाऱ्या बापाची टिंगल टवाळी करत असतात. हीच मुले एकमेकांच्या वडीलांच्या नावाने हाक मारतात.

ज्या घरात बाप असतो त्या घराकडे कोणाची वाकडी नजर करून पाहण्याची हिम्मत होत नाही. कारण त्या घरातला कर्ता जिवंत असतो. जरी तो काही करत जरी नसला तरी तो त्या पदावर असतो आई असण्याला अथवा आई होण्याला वडीलांमुळेच अर्थ प्राप्त होतो.

कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला कि जवळी वाटते ती आई, कारण ती कौतुकाने जवळ घेते, आपले लाड करते, पण गुपचूप जावून पुढे आणनारा बाप कोणालाच दिसत नाही. चटका बसला की तर लगेच “आई ग” हा शब्द आपण उच्चारतो पण एखादा मोठा रस्ता ओलांडताना अचानक जर एखाद्या ट्रक ने जोरात ब्रेक मारून मोठे संकट टाळले तर त्या वेळी आपण “बाप रे…..!” असे म्हणतो. छोटी छोटी संकटे आई सोसती हो, पण मोठी वागळे पेलताना बापच आठवतो……..

एखाद्या मंगल प्रसंगी अखंड कुटुंब सहभागी होत असते, पण जर एखाद मयत झालं तर बापाला एकट्यालाच जाव लागत. मुलाच्या नोकरी साठी लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंभरे झिजवनारा बाप, घरच्यांसाठी स्वःच्या व्यथा दडपवनारा बाप खरच किती ग्रेट असतो.

बापाचे खरे महत्त्व ज्यांना कळते ज्याचे वडील लहानपणीच जातात आणि घरच्या सर्व जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. एकेक गोष्टीसाठी त्यांना कष्ट कराव लागत तेच बापाच महत्व समजतात

बापाला समज़ुन घेनारी एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे त्याची मुलगी, सासरी गेल्यावर ही अथवा घरापासून दुर असताना ही फक्त फोनवर बोलताना वडीलांचा आवाज जरी बदलला असला तरी त्यावरून सतरा प्रश्न विचारेल

वडिलांना खऱ्या अर्थाने ओळखते ती मुलगीच असते. आणि वडिलांना जपनारी त्याची काळजी घेणारी ही मुलगीच असते…………..

“Father is someone who has faith in you even when you fail”


कोणी आपली गाडी २ मिनीटासाठी

मागितली तरी आपला जीव खाली वर होतो

आणि तो बाप लहानपणापासुन जपलेली बाहुली

हसत हसत दुसऱ्याला देऊन टाकतो………. बाप ……..बाप हा बापच असतो.

त्यांच मन कोणालाच न कळण्यासारख असत ……………...

Friday, April 17, 2020

माझ्या आठवणीतील शाळा. भाग ३


शाळा म्हटली की जसा फळा आठवतो तसे एकदम रिकामे बाक ही नजरे समोर येतात. स्वत:च्या हक्काची जागा आणि आपले अस्तित्व दाखवणारी एकमेव जागा म्हणजे आपला बाक. तो बाक आपल्या आयुष्यात एवढा महत्वाचा ठरू शकेल हे कधी स्वप्नातही न सुचलेले. बाकावर दप्तर ठेवणे, बाकाच्या खालच्या कप्यात वह्या पुस्तक ठेवणे. परीक्षेच्या काळात कॅापीचा कागद बाकाच्या खाली लपवने, रिकाम्या वेळात तबला समजून वाजवणे असे एक ना अनेक रूपे बाकाची. याचं बाकावर डोके ठेऊन झोपलेले. मार्कांची लाज वाटली की बाकात डोके खुपसायचे, पेन-पट्टीचा खेळ याचं बाकावर रंगायचा. शिक्षकांनी डस्टर आपटल्यावर बनलेल्या खडूच्या पाउडरच्या ठश्यात बोटाने रांगोळी काढण्यात मजा यायची ती वेगळीच. शिक्षकांनी पुस्तके वह्या काढायला सांगितली की दोनंदा-तिनदा स्वतःच्या बाकावर जोरात आपटून वर्गात तात्पुरती अशांतता पसरवने. या सर्व करामती केवळ एका बाकामुळे शक्य झाल्या.


पुढे वर्ग वाढला, बाकांची उंचीही वाढली. गणितात कर्कटक जेवढे वापरले नसेल तेवढे ते बाकावर वापरले. मध्येच एखादी नक्षी, मग स्वतःच्या ग्रुपचे नाव, मैत्रीणिंची नावे, मधूनच बाकाला होल पाडने अश्या अनेक गोष्टी कर्कटकाच्या सहाय्याने केल्या. बाकावर पडलेले शाईचे डाग, चित्रकलेच्या तासाला सांडलेले रंग, काही आगाऊ मुल बाकावरून चालल्यामुळे उमटलेले मातीने ठसे, मधल्या सुट्टीत बाकावर बसुन जेवलेली ती मजा काही वेगळीच होती. पण बाकाचे अस्तित्व खरे तेंव्हा जाणवायचे जेव्हा डोके बाकावर ठेवलेले असताना बोटाने हलके ठोकुन कानाने त्याचे पडसाद ऐकतो.

चार भिंतीची माझी शाळा ।

पांढऱ्या भिंती आणि फळा काळा ॥

तो शाळेतला विशाल फळा नाही आठवला असे होनारच नाही. शिक्षकांनी फळ्याकडे तोंड केले की शांत बसलेल्या मुलांमधे चुळबुळ सुरू व्हायची. सगळ्यां समोर शिक्षा केली की मात्र लाज वाटायची. फळ्यावरचा सुविचार रोज नविन काहीतरी शिकवून जायचा. वर्गप्रमुख जेंव्हा वर्ग सांभाळायचा तेंव्हा बोलणाऱ्या मुलाची नावे फळ्यावरच लिहीत असे आणि एवढे करून तो मुलगा बोलत असेल तर त्याच्या नावांपुढे फुल्या चढवल्या जात. वहीत शंभर वाक्य लिहीली असली तरी खडुने फळ्यावर लिहीण्याची शान वेगळीच होती.

शिक्षक फळ्यावर लिहीत तेंव्हाही मजा वाटे. काही शिक्षक मोत्यासारखे वळणदार अक्षरात लिहीत असे तर काही शिक्षकांच्या अक्षरांची आगगाडी कधी वर तर कधी खाली जात असे. चित्रकलेचे सर थोड्याच वेळात दोन रंगाच्या खडूंचा वापर करून अप्रतिम चित्र काढत तर विज्ञानाचे शिक्षक चार रंगांचा खडु वापरूनही प्रयोगाची आकृती धड काढत नसे. इतिहासाच्या तासाला फक्त सनावळ्या लिहील्या जायच्या तर गणिताच्या तासाला तो मोठा फळा ही कमीच पडायचा.

तर असा हा फळा. एकाच रंग, एकच आकार पण असंख्य गोष्टी त्याच्याशी जडलेल्या. कित्येक गोष्टी त्याच्यावर लिहील्या गेल्या, आणि पुसल्याही गेल्या. आज परत शाळेत जायचा योग आला, तर आवर्जून मी त्या वर्गातल्या बाकावर बसेन जरी मला त्यात नीट बसतां नाही आले तरी. आजही त्या फळ्यावर सुविचार लिहायचाय. आज सर्व काही झपाट्याने बदलत असताना तो ‘बाक’ आणि तो ‘फळा’ आणि त्याचा स्वतःचा असा विशिष्ट वास अजून स्मरणात आहे.

Thursday, April 16, 2020

माझ्या आठवणीतील शाळा. भाग २

वेळापत्रकाप्रमाने जरी शाळा भरली असली तरी जो पर्यंत शिक्षक वर्गात येत नाहीत तो पर्यंत खऱ्या अर्थानेशाळा भरत नाही. आमची पहिलीच batch होती ती semi-English ची, म्हणजे आम्ही पाचवी ला गेलो आणि Semi-English चालु झालं. म्हणजे काय ३ विषय मराठी भाषेतून आणि ३ विषय English मधुन. शिक्षकांना वाटले आताच पोरं मराठीतून English कडे वळलेत थोडीशी सूट द्यावी त्यांना. तो पाचवीचा आमचा वर्ग खुप लाकडा होता पुर्ण शाळेचा. मस्ती तर खुपच करायचा तेवढाच हुषार पण होता.

वर्गातला ती पहिली तासिका नेहमीच वर्ग शिक्षकांची असायची. डस्टर आपटल्याचा आवाज आला की शिक्षक वर्गात आलेत असं कळायच. त्या डस्टरच्या आवाजानेच मित्रांशी गप्पा मारणारा बेसावध मुलगा भानावर येउन सर्वात शेवटी उभा राहतो. त्याचे उभे राहणे आणि आणि इतरांचे खाली बसणे एकाच वेळी झाले की वर्गात हास्यकळोळ व्हायचा. हजेरी सुरू व्हायची. काही वेळेस नावं वाचून हजेरी घ्यायचे शिक्षक नाहीतर काहीवेळा हजेरी क्रमांका वरून. शिक्षकांच्या नजरा खाली असल्यावर ‘हजर’ आणि ‘गैरहजर’ बोलायला मजा यायची. काहीवेळा तर दूसऱ्यांची हजेरी द्यायचो आम्ही.

मुलांचे वाचन किती आहे आणि ते वाढावे, त्यांना नविन शब्दांचीच ओळख व्हावी, म्हणू आणि वाकप्रचार स्वत:हून वाक्यात उपयोग करणे अशी काही ‘निबंध’ लिहीण्यामागे कारण असतं. मात्र शाळेच्या मुलाच निबंध वाचले की त्यांचे वाचन, निरीक्षण आणि साधेपणातुन होनारी विनोदी निर्मीति यांचे दर्शन घडवते. बऱ्याचदा निबंधची अभंगातील ओळ किंवा एखादी म्हण या पासुन सुरूवात होते. पहीलांदा लिहायला लागल्यावर निबंधाचा विषय सोपा वाटू लागतो आणि पेन हातात घेतला कि काय लिहू आणि कसे लिहू असं वाटायच. थोड तिरक्या नजरेने समोरच्यान काय लिहीले आहे बघायच दोन ओळी दिसल्या की वेळ न घालवतां ते स्वत:च्या वहीत लिहायच.

इंग्रजी निबंध लिहायला सांगितला की आम्ही ते रट्टा मारून पाठ करुन व त्यातूनच विनोदी निर्मिती करायचो. एकदा मराठी पत्र लिहा असे सांगितले पत्राचा विषय होता. ‘तुमच्या मित्राच्या आईचे निधन झाल्यावर मित्राचे सांत्वन करा.’ त्यात एका मैत्रीणीने पत्राची सुरवात रट्टा मारल्या प्रमाणे उजव्या बाजुस पत्ता, खाली प्रिय मित्र राजु यास, वगैरे केली. पुढे मात्र तीच्या पत्राला खरा रंग चढवला. काल तुझे पत्र मिळाल आनंद झाला. मी तुझे पत्र वाचले. वाचून दू:ख झाले. अश्या विषयांशी निगडीत वाक्य लिहून, “ तुझ्या आई-वडीलांना माझा नमस्कार सांग” असे लिहून तिने पत्राचा शेवट केला.

आता ई-मेल काळात पत्रे लिहीण्याचा योग येत नाही. C.I.D. आणि M.B.B.S. या शब्दाते विस्तारीत रूप माहीत आहे पण शि.सा.न.वि.वि. अजुन कोड्यात आहे. आता मुद्दाम प्रयत्न करुनही एवढे साधे निबंध व पत्र लिहीता येनार नाही. चुकून फक्त शाळेची वही सापडली की थोडा वेळ ती वाचून हसायचे एवढेच उरले आहे.

Wednesday, April 15, 2020

माझ्या आठवणीतील शाळा. भाग १

                                                माझ्या आठवणीतील शाळा. भाग १

आपण आपल्या जीवनाची बारा वर्ष शाळेय जीवनात घालवले. या वर्षात आपण खूप काही कमावले आणि बरेच काही गमावलेही. आपल्या शाळेच्या कडु-गोड प्रसंगावर वेगळ्या नजरेने बघुन त्याला प्रकाशझोतात आणण्याचा माझा छोटासा प्रयत्न. मला नक्की खात्री आहे कि या अनुभवातून तुम्हांला ही तुमच्या शाळेच्या गमतीजमती आठवतील.

शाळा, शाळेचा बाक, फळा, रंगीत चित्रानी सजलेली शाळेची भिंत, सुविचार, परीक्षा, स्पर्धा, परिपाठ, गृहपाठ, सहल, शिक्षक, मित्र-मैत्रिणी, शिक्षा, वत्कृत्व स्पर्धा, शिपाई काका, ग्रंथालय, संगणक विभाग, प्रयोगशाळा, वाढदिवस, गणवेश, सण, दिवाळीची वही, ॲाफ पिरेड, डबा, शिक्षक दिन, बालदिन, प्रजासत्ताक दिन तसेच स्वातंत्र्य दिन, प्रार्थणा, मराठीचे भन्नाट निबंध आणि इंग्रजीचे अजब स्पेलिंग. गणितातील सुत्रे व इतिहासातील इसविसन, हिंदीचे व्याकरण त्यांच बरोबर सर्वात महत्वाची शाळेची घंटा या सर्वांचा विचार तुमच्या डोक्यात आला असणारच.तर उजळुया जुन्या आठवणी आणि भरवूया आपल्या मनांत आपलीच शाळा.

शाळेचा तो पहिला दिवस. पहिली त होते त्या वेळेच काही आठवत नाही, पण पाचवीचा आठवतो. नविन शाळा, नविन शिक्षक माझ्यासाठी सगळंच नविन होत. पहिल्या दिवशी शाळेत प्रवेश केला तेव्हा खुप छान वाटत होत. शाळा भरली. शिक्षक शिकवायला सुरूवात करतात. शेजारीची परकी मुलगी आपली मैत्रीण बनते. पहील्यांदाच बाकावर बसवण्याच फिलिंग वेगळच होत. दुपारी एकत्रित बसुन जेवन करन सगळंच वेगळ होत माझ्यासाठी. मग घंटा वाजते शाळा सुटल्याची बाबा बाहेर उभे असतात आपल्याला घेउन जाण्यासाठी मात्र आपण नविन शाळेत एवढे रमलेलो असतो की आता तिथेच राहावसे वाटते. परंतु निघणे गरजेचे असते. घरी आल्यानंतर ओढ लागते ती दुसऱ्या दिवसाच्या शाळा भरणाऱ्या घंटेची.

सकाळच्या शाळेचा राग फक्त हिवाळयाच्या दिवसातच यायचा. सकाळी लवकर उठायला लागायचे. थोडा वेळ उभ्या उभ्या ही झोप यायची. आईच्या ओरडण्याने मात्र पार झोप उडून जायची. मग धावतच शाळेत जायचे. उशीर झाला की सकाळच्या शांत वेळात शाळेच्या परीसराजवळ आल्यावर प्राथनेचा आवाज ऐकु यायचा. प्रार्थणेला नाही वेळेत पोचलो की शिपाई काका आमच्या कडुन मैदान साफ करून घ्यायचे. त्याची नजर चुकवून आम्ही वर्गात पळायचो. .

प्रार्थणा ही मुलांना शिस्त लावण्याचा एक मार्ग. पण बऱ्याचदा तो व्यर्थ जातो. आम्हाला मंचावरून शिक्षकांची सूचना असायच्या एका रांगेत उभे रहा. दोघांमधे एका हाताच अंतर असु द्या. उंचीप्रमाणे उभे रहा. आमच्या कडुन हात जोडून प्रार्थणा म्हणायला लावतात. बऱ्याचदा स्पिकरवरुन प्रार्थणा ऐकवली जाते आणि मुले हात जोडुन उभे असतात. या सर्व चित्रात पहिल्या दोन रांगेतील मुलेच शांतपणे शहाण्या मुलांसारखं डोळे मिटून प्रार्थणा म्हणत असतात. शेवटच्या आणि गर्दीचा फायदा घेणाऱ्या मधल्या रांगेतील मुल आपल्या स्वःताचाच दुनयेत असतात. कोणी मध्येच स्वर उंचावनार, मध्येच कोणीतरी ओरडणार. काहीजण मुद्दामच शब्द मागून बोलल्यानंतर तो उच्चारणार. काही मस्तीखोर मुले बाजुला उभ्या असलेल्या शांत मुलाला त्रास देण्यास व्यस्थ असतात. मध्येच एकजण शेजारच्या मुलाला बाजुच्या उभ्या असलेल्या मुलीवर ढकलणार. मैदानात बसलेलो असताना जवळची दगडी मागे न बघताच फेकणार आणि सर्वात जास्त मजा, सर्व कार्यक्रम झाल्यावर मागच्या मुलीच्या उठण्याच्या आधी उठून स्वःतची मातीने भरलेले कपडे झटकण्यात येते. वर्गात जाताना हाताचा घडी घाला आणि एका रांगेत वर्गात जावा अशा सूचना असायच्या आम्हाला. पण शिक्षकांच्या सुचना ऐकतील ती मुल कसली. आमच्यात शर्यत लागायची कोण पहिला वर्गामध्ये जातय त्याची. आम्ही पळतच जीण्यावरून वर्गात जायचो.

पण ही सर्व मजा करत असताना कळत नकळत आमच्यावर त्या प्रार्थनेचे संस्कार होत होते. प्रार्थणेतून मिळणाऱ्या उत्साहानेच संपुर्ण दिवस चांगला जायचा.आज मात्र त्या शाळेसमोरून जाते तेव्हा ती शाळा ते मैदान आणि मातीने माखलेल्या त्या कपड्यांची उणीव भासते.





Tuesday, April 14, 2020

कन्यादान

कन्यादान म्हणलं की आई बाबांच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस. असाच एक अविस्मरणीय कन्यादानाची गोष्ट माझ्या डोळ्यांसमोर आली. तुम्हाला वाटत असेल माझ्या लग्नाचा दिवस असेल, हा तो दिवस तर कधीच विसणार नाही मी. पण! असा एक दिवस होता तो माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस ठरला.

आज किशौरीच लग्न होत….. पूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते…… पूर्ण घर फुलांनी सजवले होते……

किशोरी तर एखाद्या परी सारखी दिसत होती….. नाजुक सुंदर…. खुप खुश होती ती….. तीच ते चेहऱ्यावरच मोहक हास्य तीच सौंदर्य आणखी खुलवत होते……. तिचा होणारा नवरा अभि तिच्याकडे प्रेमाने पाहत होता…… काही दिवसांपूर्वीच अभि तीला पाहायला आला होता….. आणि बघताक्षणीच त्याने लग्नाला होकार दिला होता….. खुप सुंदर जोडी होती त्यांची……

पण थोड्याच अंतरावर सयाजीराव उभे होते…. किशोरीचे बाबा….. खुप कौतुकाने मुलीकडे पाहत होते….. किशोरीच्या चेहऱ्याकडे पाहत पाहत ते भुतकाळात हरवले……. किशोरीचा चेहरा तिच्या आई सारखाच होता…… साधी सरळ होती तिची आई…… मोठ्या थाटात लग्न झालं होत त्यांचं…...एक वर्षांचा सुखी संसार झाला असेल त्यांचा…… मग चाहुल लागली येनाऱ्या बाळाची……. खुप जपायचे सयाजीराव त्यांना…….. पण …… पण प्रसूतीचा वेळी अघटित घडले……. आणि एका मुलीला जन्म देऊन……. तिने निरोप दिला या जगाला…...कायमचा…..

सयाजीराव कोलमडले होते…….पण त्यांनी त्या निरागस मुलीकडे पाहीलं…… तिचे डोळे आईला शोधत होते……. त्यांनी तिला उचलून घेतले……. अगदी कुशीत….. खुप रडले…… पण शेवटच……. त्या दिवसानंतर त्यांच्या डोळ्यात आजच पाणी आल होत….. त्यांचे डोळे भरून आले होते…… भरल्या डोळ्यानी कौतुकाने ते मुलीकडे पाहत होते……..

कीशोरीने तिच्या बाबांकडे पाहिलं…...त्याचे भरलेले डोळे बघुन तिच पण मन भरून आल…..तिला आठवले जुने दिवस…...तिचे बाबा हेच तिच जग होत…… जसं कळतय तसं तिचे बाबा तिची आई बनले होते….. आईची आठवण तिला कधीच आली नव्हती……. तिला हे पण समजलं की तिच्या बाबांनी फक्त तिच्यासाठी दुसर लग्न केलं नव्हत…..तिची किती काळजी करायचे तिचे बाबा….नोकरी सांभाळताना कधीच तिच्याकडे दु्र्लक्ष केलं नाही…….

आजारी पडली कि रात्र रात्र न झोपतां तिच्या बाजुला बसुन रहायचे….. शाळेत सोडायला यायचे आणि एकटीला सोडुन परत जाताना चार वेळा वळुन पाहायचे….

किशोरीला पण बाबांन बद्दल खुप जिव्हाळा होता…… आपल्या नंतर त्यांची कोण काळजी घेणार….?? किशोरीच मन अस्वस्थ झालं…...आणि तिला आठवला मागच्या महिन्याचा प्रसंग…..

किशोरी झोपली होती…. अचानक तिला कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला...ती जागी झाली आणि पळतच बाबांच्या खोलीत गेली…. तिचे बाबा समोर छातीला हात लावून कळवळत होते…..तडफड करत होते….तिला काय करावे सुचेना……

“बाबा... बाबा... काय होतय….???” तिने पळत जाऊन पाणी आणल…. पण ती परत येई पर्यंत ते शांत झाले होते….. हातातील पाण्याचा पेला अलगद खाली गळुन पडला….आणि ती तिच्या बाबांना हाक मारु लागली…..रडू लागली…...आणि अचानक सयाजीरावांचे श्वास पुन्हा चालु झाले…… आणि उठूनच बसले…..किशोरी त्यांना बघून रडू लागली….ह्रदय विकाराचा एक झटका त्यांना येऊन गेला होता…...कसे बसे वाचले होते ते……. किशोरीला तो दिवस आठवला की अंगावर शहारा यायचा आणि डोळे भरून यायचे….

त्यादिवसापासुन तिचे बाबा तिच्या लग्नाच्या मागे लागले…..विवाह संस्था मध्ये चकरा मारू लागले…… मध्येच वकिला कडे पण जायचे…. जेवनाचे भान नाही की आराम नाही……. सतत फक्त तिच्याच लग्नाचा विषय….त्या चिंतेमुळे कि काय त्यांची तबियत पूर्ण ढासाळली होती….. डोळे आत गेले होते…….चेहरा निस्तेज दिसत होता….. अशातच एक दिवस अभि च स्थळ आल….. देखणा मुलगा… चांगली नोकरी…..घरंदाज घरान सर्वकाही एकदमच व्यवस्थित……..

त्यांच्याकडुन लगेच होकार मिळाला….. किशोरीने पण लाजून होकार दिला…… तिच्या बाबांनी लगेच एका आठवड्याची तारीख काढली होती…… सर्वकाही एकदमच गडबडीत…… किशोरी काय बोलली तर ते बोलायचे…. “ मला लवकर माझी जबाबदारी पूर्ण करायची आहे…….”

आता कन्यादानाची वेळ आली होती….. भरल्या डोळ्याने आणि जड अंतकरणाने त्यांनी कन्यादान केलं…… जाताना खूप रडले दोघे…...किशोरीचे तर पाय निघतच नव्हते बाबांना सोडुन जाताना….. पण जगाची रीतच होती….. किशोरी गेली…… पाहुणे पण गेले…..तिचे बाबा खुप वेळ एकाच जागी बसलेले होते……. नंतर त्यांनी कागद आणि पेन घेतला काही लिहू लागले…….

दुसऱ्या दिवशी किशोरला वाईट बातमी मिळाली…. तिचे बाबा हे जग सोडुन गेल्याची….. ति आणि अभि लगेच निघाले…… लोक जमले होते….. किशोरी खुप रडत होती…. तिचा बाबा निर्जीव पडून होता समोर…….अंतविधि पार पडला….. किशोरी अजुनही रडतच होती…. तेवढ्यात तिच लक्ष टेबलावर ठेवलेल्या चिठ्ठीवर गेल…… ज्यावर पेपर वेट म्हणुन तिची बाहुली ठेवली होती……. तिने ति चिठ्ठी उचलली……. खाली घर आणि जमीनीचे कागदपत्र होते….जे त्यांनी दोन आठवड्या आधीच तिच्या नावावर केलं होत…...ती चिठ्ठी वाचू लागली….

माझी छकुली………

“तु आधी डोळे पुस…..तुला माहीतच आहे की मी तुला रडताना बघु शकत नाही…. एक ना एक दिवस हे होणारच होत…… नको रडूस…… मी खरच खुप भाग्यवान आहे कारण या जगात मुलीचा बाप असणं ही भाग्याची गोष्ट आहे….. पण मला तुझी आई आणि बाबा हे दोन्ही पण बनून राहता आल….. खुप समजुदार निघालीस तू……. कधीच आईचा हट्ट केला नाहीस….. तरी पण माझ्याकडून काही कमी राहीली असेल तर माफ कर पोरी…. तुला आठवत असेल त्या दिवशी मला ह्रदय विकाराचा झटका आला होता….. खर तर तेंव्हाच मी हे जग सोडल होत….. माझ्या समोर अंधार पसरला…..माझ्या समोर रेड्यावर बसलेला काळाकुट्ट धिप्पाड व्यक्ति होता. त्याच्या हातात मृत्यू पाश होता….. जो माझ्या भोवती आवळला जात होता…. मी हात जोडून त्यांना विनंती केली आणि फक्त एका महिन्यासाठी हे शरीर मागून घेतले … माझ्या विनंती ने नाही पाहून तुझी आर्त साद ऐकुन त्यांनी मला एवढा वेळ दिला…. मागचा महिना जो तुझ्याबरोबर होता तो फक्त आत्मा होता… ज्यांच शरीर उधारीवर शिल्लक होत… पण माझ काम झालं आता….. वकिला कडून सर्व मालमत्ता तुझ्या नावावर केलीच आहे. पण मला जे हव होत ते मिळाले. मी कन्यादानाच पुन्य मिळवलं. यातच सर्व काही आहे. आणि आता डोळे पुस आनंदाने आयुष्य जग… सर्वांना आनंदी आणि सुखी ठेव माझा आशिर्वाद सतत तुझ्या सोबत राहील… सुखी रहा पोरी…..”

तुझाच बाबा………..

किशोरीचे अश्रु थांबतच नव्हते. तिचे बाबा तिच्यासाठी मृत्यू कडून पण वेळ काढून थांबलेले होते..ते पण तिच्या कन्यादानासाठी …. एका मुलीचा बापच हे करू शकतो……. तेवढ्यात तिच्या खांद्यावर हात पडला….. मागे अभि होता…. त्याने तिचे अश्रु पुसले आणि बोलला ……..” मी तुझ्या डोळ्यात अश्रु नाही पाहु शकत….” किशोरी बिलगली…… पिता नंतर आता पतीच तिच सर्वस्व होता…………...